सवाई माधवराव पेशवे किंवा माधवराव नारायण हे मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणजेच पंतप्रधान होते. यांचा जन्म 18 एप्रिल 1774 मध्ये किल्ले पुरंदर येथे झाला, सवाई माधवराव यांनी 1782 ते 1795 या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरावाचा हा पुत्र होता. सातारा दरबाराच्या संकेतांनुसार पदारूढ पेशव्याचा पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे, माधवराव नारायणाचा पेशवेपदावर कायदेशीर हक्क होता. परंतु नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाईवर हक्क सांगणाऱ्या रघुनाथरावाला पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवेपदापासून दूर ठेवले व माधवराव नारायणास साताऱ्याच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होते वेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.
» अधिकारकाळ
इ.स. 1782 ते इ.स. 1795
» पूर्ण नाव
माधवराव नारायणराव भट 【पेशवे】
» जन्म
18 एप्रिल 1774
किल्ले पुरंदर,मराठा साम्राज्य
» मृत्यू
27 ऑक्टोबर 1795
शनिवारवाडा,पुणे,मराठा साम्राज्य
» पूर्वाधिकारी
नारायणराव पेशवे
» उत्तराधिकारी
दुसरा बाजीराव
» वडील
नारायणराव पेशवे
» आई
गंगाबाई
» पत्नी
यशोदाबाई
राधाबाई
» राजघराणे
पेशवे 【भट】
सवाई माधवरावच्या वेळी पहिले इंग्रज-मराठे युद्ध 【1774 -82】 टिपूविरुद्ध केलेली श्रीरंगपट्टणची लढाई 【1786-87】 इंग्रज-निजामा संयुक्त मोहीम 【1790-92】 खर्ड्याचे युद्ध 【1795】 उत्तरेकडील राजे-रजवाडे आणि मुस्लिम संस्थानिक यांशी केलेली युध्दे 【1784-91】 अशी अनेक युद्ध घडले आणि मराठ्यांनी अखिल हिंदुस्थानात पुन्हा नावलौकिक मिळविला,पेशव्यांच्या दरबारात आलेल्या चार्ल्स मॅलेट या इंग्रज वकिलाने सवाई माधवराव विषयी अनेक गोष्टी तपशीलवार लिहून ठेवल्या आहेत. त्यावरून त्याची शरीरयष्टी,स्वभाव आणि वर्तन यांवर प्रकाश टाकता येतो.
महादजी शिंदे 1792 मध्ये महाराष्ट्रात आले. या मुक्कामात त्यांनी माधवरावास मानमरातब, मेजवान्या, पानसुपाऱ्या केल्या; स्वारीशिकारीला बरोबर घेतले व धनीपणाचा हक्क बजाविण्याविषयी सांगितले. तेव्हापासून पेशव्यास परिस्थितीचा विशेषतः परावलंबित्वाचा उलगडा झाला. खर्ज्याच्या मोहिमेवरून पेशवा 1795 मध्ये परत आला. 【दुसरा】 बाजीराव रघुनाथ जुन्नर येथे कैदेत होता. त्याने पेशव्याशी गुप्तपणे पत्रव्यवहार सुरूकेला होता. नाना फडणिसाने तो पत्रव्यवहार पकडून पेशव्यास शरमिंदे केले. यावेळी कारभाऱ्याने आपल्याला कसलीही मोकळीक देऊ नये, याची त्यासखंत वाटू लागली. त्यात तापाने तो आजारी पडला. दसऱ्याचा समारंभ कसाबसा पार पडला सवाई माधवराव 25 ऑक्टोबर 1795 रोजी तापाच्या भरात त्याने शनिवारवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कारंज्यावर उडी टाकली व 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निधन झाले.
सवाई माधवराव स्वतः कर्तबगार वा सुज्ञ नव्हता, तरी त्याच्या अस्तित्वाने मराठ्यांची सत्ता एकवटून राहिली होती. त्याच्या मृत्यूनंतर पेशवाईत परस्परातील हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरु झाली व विघटनवादी प्रवृत्तीला ऊत आला. त्यानंतर 20-22 वर्षांत इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता नष्ट केली.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!