स्वामी दयानंद सरस्वती हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत.सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध असून स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे.
» नाव
स्वामी दयानंद सरस्वती
» जन्म
12 फेब्रुवारी 1824
» वडील
करशनजी लालजी तिवारी
» आई
यशोदाबाई
» निधन
30 ऑक्टोबर 1883
» शिक्षण व सामाजिक कार्ये
वयाच्या 05 व्या वर्षी त्यांनी संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. 08व्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदाध्ययनाचा प्रारंभ केला. सामवेदी असूनही त्यांनी प्रथम शुक्ल यजुर्वेदाचे अध्ययन केले होते. 14 व्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण करून मुंजी नंतर त्यांनी शैल पंथाची दीक्षा घेऊन पार्थिव पूजा स्वीकारली होती.
अतर वेदांतील काही भाग व संस्कृत व्याकरणाचे ग्रंथ याचे ही अध्ययन त्यांनी केले होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होण्याचा काळ आला आणि शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असताना, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला व देव म्हणजे मूर्ती नाही हे त्यांना समजले.
त्यांनी हा प्रश्न आपल्या वडिलांना विचारला पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. धर्म व देव यांच्या संबंधी विचारांना मात्र चालना मिळाली होती. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची लहान बहीण आणि चुलते अंबाशंकर यांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता. मृत्यूच्या भीतीतून सोडविणारा मोक्ष कसा मिळेल याचाच सतत विचार करू लागले होते.
अनेकांना त्यांनी यासंबंधी प्रश्न विचारले होते. योग अभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही हे स्वामी दयानंद सरस्वती यांना समजले होते. मुलाच्या मनात वेगळेच विचार आहेत हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हे स्वामी दयानंद सरस्वती यांना समजताच 1845 मध्ये गृहत्याग केला.
स्वामी दयानंद सरस्वती संन्यासीच्या समूहात दाखल झाले आणि तेथे ब्रह्मचर्याची शिक्षा घेऊन त्यांनी " शुद्ध चैतन्य" हे नाव धारण केले होते. यानंतर त्यांनी सुमारे पंधरा वर्षे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन केले होते. अनेक संन्यासी ज्ञानी यांची त्यांनी भेट घेऊन अनेक शास्त्रांचे सखोल ज्ञान प्राप्त केले.
तांत्रिक आचार, कर्मकांड, मुर्तिपूजा,धर्माचरण, अंधश्रद्धा इत्यादी अनेक गोष्टींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी पूर्णांनंद नावाच्या स्वामीपासून संन्यास धर्माची शिक्षा घेऊन दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. 1860 साली मथुरेस अत्यंत ज्ञानी असलेल्या स्वामी विराजानंद या अंध गुरुकडे ते आले होते.विराजानंद जवळ स्वामी दयानंद सरस्वती हे 03 वर्ष राहिले व याच काळात त्यांच्या धार्मिक तसेच सामाजिक सुधारणेच्या विचारांचा पाया घातला गेला व पुढील अनेकविध कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर दयानंदानी पुन्हा भारतभर परिभ्रमण केले होते.
त्यावेळी त्यांनी मूर्तिपूजा, रुढीप्रियता, जातीभेद, हिंसात्मक, यज्ञ या गोष्टीवर टीका करणारी व्याख्यान दिली होती. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथानाच वेद मानत होते. कारण त्यामध्ये जन्मसिद्ध जातिभेदास आधार नव्हता. वेदांचा आधार घेऊन नवे विचार मांडण्यास सुरुवात केली.
अस्खलित संस्कृतात शास्त्री पंडितांबरोबर त्यांनी वादविवाद केले होते. त्यांनी काशीला 1869 साली पंडितांबरोबर शास्त्रार्थ केला होता. दयानंदांचा उदात्त हेतू लक्षात न घेता पंडितांनी केवळ शब्दप्रमाणाच्या आधारावर त्यांना उत्तरे दिली होती. यानंतर दयानंदानी प्रयाग, कलकत्ता, मुंबई अशा अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन आपले नव धर्मसुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडले होते.
1875 मध्ये मुंबई येथे त्यांनी आपल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली.आपल्या वैदिक धर्म विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश या प्रांतात दौरे करून धर्मजागृती केली.
आर्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथ लेखनास सुरुवात केली.त्यांनी यजुर्वेद आणि ऋग्वेद यावर संस्कृतात भाषणे लिहिलेली आहेत. ऋग्वेदाच्या काही भागावर भाष्यही केले आहे. पण त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे “सत्यार्थप्रकाश” हा आहे.यात त्यांनी वेदातील ज्ञान भांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले आहे. आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ सत्यार्थप्रकाश हा समजला जाऊ लागला. याशिवाय दयानंदांनी संस्कार विधि, पंचमहायज्ञ विधि, गोकरुणानिधी इत्यादी ग्रंथ लिहून आपले विचार जनतेसमोर मांडले होते. त्यात त्यांनी शुद्ध वैदिक धर्माचे स्वरूप स्पष्ट केले असून पाखंडी मतांचे खंडन केले.
मूर्ती पूजेचा धिक्कार, स्त्रियांना आणि शूद्रांना वेद अध्ययनाचा अधिकार आहे हे सिद्ध केले, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले, जातीभेदावर टीका केली आणि ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी इत्यादी धर्मातील दोष उघड करून दाखविले होते.
कोणतेही भेद लक्षात न घेता कोणालाही आर्य समाजाचे सदस्य होता येत होते. आर्य समाजाच्या सदस्यांसाठी नियम तयार केले गेले होते. प्रत्येक रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन केले जायचे. प्रत्येकाने रोज संध्या, होम, गायत्री जप व वेद पाठ या गोष्टी केल्या जात होत्या.या सर्व गोष्टी करण्यास पुरोहिताची आवश्यकता लागत नव्हती. ब्रह्मचर्य, सत्य, भक्ती इत्यादी प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. सर्व सत्याचे मूळ परमेश्वर आहे वेद हा सत्य मुलक ग्रंथ आहे त्याचा विचार करूनच धर्माचरण केले पाहिजे सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे इत्यादी विचार लक्षात घेऊन प्रत्येक आर्य समाज सदस्यांनी वागले पाहिजे असे दयानंदांनी म्हटले होते.
दयानंद हे स्वत: शरीराने, मनाने दणकट होते. अत्यंत विरुद्ध वातावरणात आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नव्हते. काशीत जाऊन मूर्तीपूजा सिद्ध करा नाहीतर विश्वेश्वर यांची मूर्ती फोडून टाका असे म्हणून ते वादास उभे राहिले होते. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारले आणि त्यावर मात केली होती. ख्रिस्ती, इस्लाम धर्माच्या पंडितांसशी वाद घालून त्यांनी त्यांना नामोहरण केले होते.
परधर्मात जाऊ पाहणाऱ्या हिंदूंना वैदिक धर्माचे महत्व पटवून दिले आणि परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले.वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले होते. सहस्त्रावधी लोकांना समाजाच्या कार्याकडे येण्यास त्यांनी प्रवृत्त केले.
» स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन
1883 साली दयानंद जोधपुरला आले होते तेथे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे म्हटले जाते. विष प्रयोगामुळे दयानंद यांची प्रकृती बिघडली आणि अजमेर येथे 30 ऑक्टोबर 1883 साली निधन झाले.
स्वामी दयानंद सरस्वती यांची माहिती कशी वाटली किंवा काही चुका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!