मराठी रंगभूमी दिन म्हणजे कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव असून विष्णूदास भावे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. चला तर मराठी रंगभूमीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
मराठी थिएटर ज्याला मराठी रंगभूमी असे संबोधले जाते. ज्याचा इतिहास शतकानुशतके जुना आहे.मराठी रंगभूमी म्हणजे प्रतिभा, सर्जनशीलता आणि सामाजिक बदलासाठी यांचा एक ठेवा आहे. म्हणूनच हा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी रंगभूमीच्या दिग्गजांना आदरांजली वाहण्याची तसेच कलाप्रकाराच्या भावनेची कदर करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. हा दिवस म्हणजे कला,संस्कृती आणि परंपरेचा जणू मोठा उत्सवच होय
दरवर्षी 05 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. 1943 साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने 5 नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला.
जागतिक स्तरावर रंगभूमी दिन 27 मार्च रोजी साजरा होत असला तरी ही मराठी रंगभूमी दिन मात्र 5 नोव्हेंबरलाच साजरा करण्यात येतो. विष्णूदास भावे यांनी मराठी नाट्यपंढरीचा पाया घातला. सांगली येथे दिनांक 5 नोव्हेंबर येथे 1843 रोजी मराठीतील पहिल्या गद्य पदमिश्रित नाटकाचा प्रयोग रंगला. हा प्रयोगच नाट्यसृष्टीचा पाया ठरला. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर 'सीता स्वयंवर' हे मराठी भाषेतील पहिले नाटक पार पडले. हीच आठवण कायम ठेऊन पुढे या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाऊ लागला.
मराठी रंगभूमी ही किर्तन, भारुड, दशावतार , पोवाडा,भागवतमेळे, नटवे, बहुरूपी, लोकनाट्य,तमाशे आदी लोकपरंपरा स्त्रोतातून झालेला आहे. लोक रंगभूमी हीच खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची जननी आहे. कारण रंगभूमीच्या प्रत्येक विकास टप्प्यामध्ये लोक रंगभूमीचे स्थान महत्त्वाचे ठरलेले आहे. या पार्श्वभूमीवर नाट्य वाङमयाचा विचार करता महाराष्ट्रास फार आदीम अशी लोककलावंतांची परंपरा लाभली असून त्यातूनच लोकरंगभूमी विकसित झालेली आहे.
■ विष्णूदास भावे गौरवपदक
मराठी रंगभूमी दिनी सांगलीची 'अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती' 1960 पासून विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला 'विष्णुदास भावे गौरवपदक' देऊन त्यांचा सन्मान करण्यात येते.गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले कलाकार
अमोल पालेकर
केशवराव दाते
ग. दि. माडगूळकर
छोटा गंधर्व
डॉ.जब्बार पटेल
जयंत सावरकर
ज्योस्ना भोळे
दाजी भाटवडेकर
दिलीप प्रभावळकर
दुर्गा खोटे
नानासाहेब फाटक
प्रभाकर पणशीकर
पु. श्री. काळे
फैयाज
बापूराव माने
बालगंधर्व
भालचंद्र पेंढारकर
महेश एलकुंचवार
माधव मनोहर
मामा पेंडसे
मास्टर कृष्णराव
रत्नाकर मतकरी
रामदास कामत
वसंत कानेटकर
विश्राम बेडेकर
शरद तळवलकर
शं. ना. नवरे
हिराबाई बडोदेकर
मोहन जोशी
इत्यादी कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदक मिळालेले आहे
मराठी रंगभूमी दिन या विषयीची वरील माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!