महाराणी ताराबाई एक यशस्वी व कर्तृत्ववान स्त्री होत्या त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना तोंड दिलं त्यासोबतच पतीच्या निधनानंतर स्वराज्य संरक्षणाचा विडा उचलला आणि स्वराज्याचे रक्षण केलं.महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर येणाऱ्या संकटा पासून स्वराज्याचा बचाव केला. महाराणी ताराबाई यांचा उल्लेख इतिहासातील कर्तुत्वान राजस्त्रीमध्ये केला जातो. कारण त्यांनी औरंगजेबाशी सात वर्षे प्रखर लढा दिला होता
■ प्राथमिक माहिती
〉 नाव
महाराणी ताराबाई भोसले
〉 जन्म
14 एप्रिल 1675
सातारा जिल्हा
〉 वडील
सरसेनापती हंबीरराव मोहिते
〉 पती
छत्रपती राजाराम राजे
〉 अपत्ये
शिवाजी दुसरा
〉 मृत्यू
09 डिसेंबर 1761
〉 पदवी
महाराणी
■ जीवन
महाराणी ताराबाई यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर म्हणजेच छत्रपती राजाराम राजे यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न यशस्वी केला. या थोर महिलेचा जन्म 14 एप्रिल 1675 रोजी झाला. ही शूर कन्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यात ताराबाई यांचे देखील श्रेय आहे. त्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्यारत्न असल्यामुळे महाराणी ताराबाई यांना लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं.
■ महाराणी ताराबाई विवाह
महाराणी ताराबाई यांचा विवाह स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा राजाराम यांच्याशी झाला. राजाराम राजे यांच्यापासून महाराणी ताराबाई यांना शिवाजी नामक पुत्र झाला जो पुढे जाऊन स्वराज्याच्या गादीवर बसला.
■ इतिहास
महाराणी ताराबाई यांचा उल्लेख इतिहासातील कर्तुत्वान राजस्त्रीमध्ये केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचा कारभार राजाराम राजे यांच्या हाती आला होता. परंतु 1700 साली राजाराम महाराज यांचा जिंजी वेढ्यामध्ये पराभव झाला पराभव होण्याआधीच ते तिथून निसटून पुन्हा महाराष्ट्रात आले होते आणि प्राकृतिक कारणांमुळे 03 मार्च 1700 मध्ये राजाराम राजे यांचा मृत्यू झाला.
पतीच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी स्वराज्य कारभार सांभाळण्याचा निर्णय घेतला. एक स्त्री देखील स्वराज्य सांभाळू शकते हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं. त्यांनी बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कानोजी आंग्रे, पिलाजी गोळे, गिरजोजी यादव अशा धाडसी सैनिकांचा आपल्या सैन्यात समावेश करून घेतला आणि स्वराज्यावर येणाऱ्या संकटांवर मात करायला त्यांनी सुरुवात केली. महाराणी ताराबाई यांनी स्वराज्य रक्षणाचा दृढ वसा घेतला.
पन्हाळा किल्ला हा मोगलांच्या ताब्यात गेला होता 1705 मध्ये तो पुन्हा हस्तगत करून कारंजा ही राजधानी बनवली आणि महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीस सुरुवात झाली. खरंतर राजाराम राजे यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी पद छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू राजे यांच्याकडे जायला हवे होते.पण त्यावेळी ते वयाने फारच लहान होते आणि पुढच्या काळामध्ये ते मोगलांच्या कैदेत होते. म्हणून महाराणी ताराबाई यांनी त्यांचा मुलगा शिवाजी यांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य कारभारास सुरुवात केली.
■ कार्य
महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर येणाऱ्या संकटापासून स्वराज्याचा बचाव केला.एका स्त्रीने मोगलांशी लढा दिला इतकच नव्हे तर औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाशी जवळपास सात वर्ष लढा दिला. स्वराज्यावर आलेल्या अनेक संकटानंतर स्वराज्य कारभार सुरळीत चालू राहील अशी आशा जनतेला दिली त्यासोबतच जनतेचे संरक्षण केलं. सैन्यांमध्ये देखील आत्मविश्वास जागा केला.परंतु औरंगजेबाच्या निधनानंतर शाहू महाराज कैदेतून सुटून बाहेर आले. आणि स्वराज्याच्या गादीवर बसण्याचा खरा मान शाहू महाराजांचा आहे.
■ महाराणी ताराबाई यांचे स्वतंत्र राज्य
शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून पुन्हा परतल्यावर शाहू महाराज हेच स्वराज्याचे खरे राजे आहेत असं काही सरदारांना वाटू लागलं महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या मध्ये मतभेद सुरू झाले. महाराणी ताराबाई यांचे काही विश्वासू सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले आणि त्यानंतर शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई यांच्या विरुद्ध युद्ध केलं आणि विजय प्राप्त केला त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी आपला स्वतंत्र राज्य कोल्हापूर मध्ये स्थापन केलं.
■ महाराणी ताराबाई यांचा भद्रकाली असा उल्लेख
महाराणी ताराबाई यांच्या अतुल्य पराक्रमामुळे त्यांनी फक्त स्वराज्यातच नाही तर मोगल, आदिलशहा, निजामशहा,दिल्ली पर्यंत आहाकार माजवून ठेवला होता. कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाई यांचे चरित्र, त्यांनी गाजवलेला पराक्रम हे खूप छान प्रकारे एका कवितेच्या माध्यमातून दर्शवले आहेत. त्यामध्ये ताराबाई यांचा भद्रकाली असा देखील उल्लेख केला आहे. महाराणी ताराबाई यांनी मोगलांना दिलेला लढा इतिहासात महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीचा ठसा उमटवतो.
■ भद्रकाली ताराबाई
दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशहाचे गेले पाणी
ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली.
ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते
खचो लागली तेवि मते
कुराणेही खंडली रामराणी भद्रकाली
राणरंगी कृद्ध झाली
प्रलयाची वेळ आली मोगलहो सांभाळा.
■ महाराणी ताराबाई इतर माहिती
महाराणी ताराबाई या इतिहासातील एक यशस्वी स्त्री होत्या. त्यांनी स्वराज्य रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूना लढा दिला. महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाची गाथा अनेक साहित्यामध्ये पाहायला मिळेल. महाराणी ताराऊसाहेब हे पुस्तक अशोकराव शिंदे यांनी लिहिले आहे. त्यासोबतच दुसरे पुस्तक म्हणजे क्षेत्राणी शिवस्नुषा ताराराणी हे पुस्तक रमेश शांतिनाथ भिवरे यांनी लिहिले आहे. या दोन पुस्तकांद्वारे महाराणी ताराबाई यांचे चरित्र, व्यक्तिमत्व तसेच त्यांच्या धाडसाचे व पराक्रमाचे अचूक वर्णन केलेला आहे.
■ महाराणी ताराबाई मृत्यू
महाराणी ताराबाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप मोठे पराक्रम करून दाखवले शिवाय एक स्त्री असून त्या काळामध्ये औरंगजेबासारख्या कपटी पुरुषाला आणि पूर्ण मोगल समाजाला पाणी पाजले या थोर महाराणीचा निधन 09 डिसेंबर 1761 रोजी झालं. सातारा मधील अजिंक्यतारा किल्ल्यावर महाराणी ताराबाई यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी ताराबाई यांची समाधी क्षेत्र माहुली येथे आहे.
रणरागिणी महाराणी ताराबाई भोसले यांच्या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!