वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते
» पूर्ण नाव
वल्लभभाई झवेरभाई पटेल
» जन्म
31 ऑक्टोबर 1875
गुजरात 【ब्रिटिश भारत】
» मृत्यू
15 डिसेंबर 1950
» आई व वडील
लालबा व झवेरबाई
» पत्नी
झवेरबा
» शिक्षण
बॅरिस्टर
» धर्म
हिंदू
» गौरव
लोहपुरुष
सरदार
» सरदार वल्लभभाई पटेल
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला एकसंघ करण्यात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी सरदार उपाधी दिली.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. 1934 व 1937 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात सुध्दा ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले.त्यांच्या काळात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापन करण्यासाठी त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील 565 संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेतले हेच वल्लभभाई पटेल यांचे सर्वात मोठे कार्य होय.
मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली.त्यामुळेच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.भारताची एकता व अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिन भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे.
» कौटुंबिक जीवन
वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये झाला. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.ते 18 वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील 13 वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा उशिरा म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली 1904 मध्ये मणीबेन व 1906 मध्ये डाह्याभाई.वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना घराची जबाबदारी सुद्धा सांभाळत होते.
» संमेलन
जुनी सांगवी 【पुणे】 येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन भरवते.
» पुरस्कार
वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या 'द ग्रेटेस्ट इंडियन' या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!