■ केशवसुत / कृष्णाजी केशव दामले
कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
〉 जन्म नाव
कृष्णाजी केशव दामले
〉 टोपणनाव
केशवसुत
〉 जन्म
07 ऑक्टोबर 1866
मालगुंड, जिल्हा रत्नागिरी
【ब्रिटिश भारत】
〉 निधन
07 नोव्हेंबर 1905
हुबळी, कर्नाटक 【ब्रिटिश भारत】
〉 राष्ट्रीयत्व
भारतीय
〉 कार्यक्षेत्र
साहित्य
〉 भाषा
मराठी
〉 साहित्य प्रकार
कविता
〉 प्रसिद्ध साहित्य
आम्ही कोण?, झपुर्झा
〉 प्रभाव
वर्डस्वर्थ,शेली,किटस्
〉 वडील
केशव विठ्ठल दामले
〉 आई
अन्नपूर्णाबाई केशव दामले
〉 अपत्ये
मनोरमा
वत्सला
सुमन
■ आधुनिक मराठी काव्याचे जनक
वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रसिद्ध कविता आहेत.
■ मराठी काव्यातील योगदान
इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते आणि नसावे हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता मात्र त्यांची आविष्कार शैली ही पूर्णतः भारतीयच होती हे विशेष आहे.
इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार 'सुनीत' या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त 135 कविताच आज उपलब्ध असून त्यांच्या या अल्प कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी,मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजरीत्या हाताळले आहेत.
गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी,बालकवी यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत हे ही तितकेच खरे आहे.
■ केशवसुत यांची लोकप्रिय कविता
ऑस्कर नामांकित चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यामध्ये केशवसुत यांची तुतारी हि कविता आहे. तसेच दादर सावंतवाडी राजा राणी एक्स्प्रेसचे नाव तुतारी एक्स्प्रेस असे ठेवण्यात आली आणि त्यांच्या या कवितेला मान देण्यात आला.केशवसुतांची तुतारी ही कविता जनसामान्य माणसात खूप प्रसिद्ध होती.
"एक तुतारी द्या मज आणून
फुंकीन मी जी स्वप्राणाने"
■ केशवसुत स्मारक
मालगुंड येथे कवी केशवसुत यांचे भव्य स्मारक उभे करण्यात आले असून कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते 08 मे 1994 रोजी स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते.
■ केशवसुत व त्यांची कविता यांवरील पुस्तके
〉 केशवसुत : काव्य आणि कला
【वि.स. खांडेकर】
〉 केशवसुत काव्यदर्शन
【रा.श्री.जोग】
〉 केशवसुत गोविंदाग्रज तांबे
【प्रा. डॉ. विजय इंगळे】
〉 केशवसुतांची कविता
【महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन】
〉 केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित
【संपादित-स.गं.मालशे】
〉 समग्र केशवसुत
【संपादक-भवानीशंकर पंडित]
■ केशवसुत यांचे निधन
केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचे निधन प्लेग रोगामुळे 1905 मध्ये म्हणजेच वयाच्या फक्त 39 व्या वर्षी झाले.
कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांच्या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!