राष्ट्रीय भूगोल दिन
महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. गेली 34 वर्षे पुण्यात हा दिवस विविध उपक्रम करून साजरा केला जातो.
भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ "पृथ्वीचा गोल' असा होतो. "भूगोल' हा शब्द इंग्रजीतील 'Geography' या शब्दासाठी पर्याय वापरला जातो. लॅटिनवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ "भूवर्णन शास्त्र'.
"पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल' असे स्थूलमानाने मानले जाते. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील भूगोलाची व्याख्या केली जाते.
भूगोलाची विभागणी प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व प्रादेशिक भूगोल अशी केली जाते. प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैविक भूगोल यांचा समावेश होतो. तसेच यासोबत किनारी प्रदेश, खनिजस्त्रोत आणि नैसर्गिक आपत्ती यांचाही समावेश प्राकृतिक भूगोलात होतो. मानवी भूगोलात ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक राजकीय भूगोलाचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलात पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि विविध संसाधन स्त्रोतांचे जनन व संवर्धन यांचा समावेश होतो. भूगोलाच्या सखोल आणि सविस्तर अभ्यासात अनेकविध पद्धतींचा समावेश केला जातो. प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षण, नकाशे यांना भूगोलात महत्त्वाचे स्थान तर आहेच पण आजकाल दूरसंवेदी कृत्रिम उपग्रहांचा वापर, हवाई छायाचित्रण यांनी भूगोलाच्या निरीक्षण क्षमतेत क्रांतिकारक भर घातली आहे. त्यामुळे बदलत्या युगात भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भूगोल विषयाचे महत्त्व व व्याप्ती
भूगोलात संख्याशास्त्राच्या वापरामुळे नेमकेपणा, गणिती अचूकता व निष्कर्ष क्षमता आली यातून भावी घटनांबद्दल अनुमान काढण्याच्या क्षमताही आल्या यामुळे स्वतःचा आशय नसणारा केवळ वर्णनात्मक विषय असे स्वरूप न राहता "भूगोलशास्त्र" हे स्वरूप भूगोलाला प्राप्त झाले आहे.
भूगोलाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण जगतो ते जग व विश्व याचे नेमके स्वरूप, विविध भूप्रदेश व तेथील जीवन, निसर्ग त्यातील संशाधनस्रोत व मानव यांचे परस्पर संबंध इत्यादी महत्त्वाच्या बाबींचे ज्ञान भूगोलामुळे होते. वेगवेगळे देश, लोक व तेथील समस्यांचे ज्ञान होते. पृथ्वीवरील भौतिक, जैविक व मानवी घटकांचे वितरण व त्यांची आंतरक्रिया यांचे स्पष्टीकरण भूगोलातून मिळते. संशोधन व विश्लेषणामुळे संसाधनांचे व्यवस्थापन, पर्यावरणीय समस्या (पूर, दुष्काळ) यांचे विश्लेषण शक्य होते. मानव संसाधनाच्या विकासाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भूगोलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
पर्यावरणशास्त्र, भूमी उपयोजन व घरांची बांधणी, नगररचना, हवामानशास्त्र, पर्यटन विभाग, नकाशाशास्त्र, सागरशास्त्र, हवाई छायाचित्रण, जी.पी.एस. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) तंत्रज्ञान, जी.आय.एस. भौगोलिक माहितीप्रणाली (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टीम) अतिप्रगत तंत्रज्ञान इत्यादी सर्व विषय भूगोलात अभ्यासले जातात.
पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे सूर्याचे उत्तर व दक्षिण दिशेकडे होणारे भासमान चलन म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होय. पृथ्वीच्या आसाचा तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी होणारा कोन 66.5 अंशाचा आहे. याचाच अर्थ पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या संदर्भात 23.5 अंशानी झुकलेला आहे.पृथ्वीच्या तिरप्या आसामुळे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध तर सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर झुकलेला असतो. पृथ्वीच्या गोलार्धाचे हे सूर्यसन्मुख व विन्मुख होणे किंवा सूर्याच्या भासमान सरकण्याला "अयन' म्हणतात. दरवर्षी 22 डिसेंबरपासून सूर्य मकरवृत्तावरून उत्तरेकडे सरकू लागतो. तो 22 मार्च रोजी विषुववृत्तावर पोचून तसाच उत्तरेकडे सरकत 21 जून रोजी कर्कवृत्तावर पोचतो. या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय. आपला भारत देश उत्तर गोलार्धातच वसलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत सूर्य रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो. या कालावधीस "उत्तरायण' असे म्हणतात.
भूगोल दिनाचे महत्त्व
तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात 22 डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते. तसेच 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकरसंक्रांतीतील सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरु असतो. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशीच्या विविध उपक्रमांत भौगोलिक प्रदर्शनांमध्ये भौगोलिक प्रतिकृती, नकाशे, तक्ते, खडकांचे, मातीचे, खनिजांचे नमुने ठेवले जातात. भौगोलिक सहलींचे आयोजन केले जाते. भौगोलिक हस्तलिखितांचे प्रकाशन केले जाते. भूगोलतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय कार्यक्रमात भूगोल दिनाचे महत्त्व सांगितले जाते.
वरील राष्ट्रीय भूगोल दिन यावर आधारीत माहिती आपणास कशी वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!