फिरोझशाह मेहता राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, नामांकित वकील, उत्तम प्रशासक आणि प्रखर राष्ट्रवादी होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते असलेले फिरोजशहा मेहता मवाळ विचारसरणीचे होते आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा ब्रिटिश आधिपत्याखालीच अधिक मुभा मिळाव्यात असे त्यांचे धोरण होते.फिरोजशहा मेहता 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.
» जन्म
04 ऑगस्ट 1845
मुंबई ,ब्रिटिश भारत
» मृत्यू
05 नोव्हेंबर 1915
» शिक्षण
बी.ए , एम.ए 【1864】
बॅरिस्टर लंडन 【1868】
» वडील
मेहरवानजी
» धर्म
पारशी
» राष्ट्रीयत्व
भारतीय
» ओळख
मुंबईचा सिंह
फिरोजशहा मेहता यांच्या वडिलांचा कलकत्त्याला व्यापार होता पण व्यापारानिमित्त ते मुंबईत अधूनमधून राहात असत. फिरोझशहांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे सर्व शिक्षण आणि बहुतेक राजकीय जीवन मुंबईतच व्यतीत झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम्. ए. होऊन ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील 04 वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन 1868 मध्ये हिंदुस्थानात आले आणि मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. 1869 साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरु केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. सुरतच्या आंदोलनातून उद्भवलेल्या दंगल केसमध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभे राहून फिरोझशहांनी कीर्ती मिळविली. कित्येक प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिलीबरोबर राष्ट्रीय जागृतीचेही कार्य केले. 1872 च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना 'मुंबईतील नागरी शासनाचे पिता' हे सार्थ नाव मिळाले. त्यांना आयुक्त करण्यात आले 【1873】. 1878 ते 1880 या तीन वर्षांत वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी, यासाठी आयात करातून देण्यात आलेली सूट, या दोन प्रश्नांवर फिरोझशहांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला.
इल्बर्ट बिलाला पाठिंबा देण्यासाठी फिरोझशहा व इतर राष्ट्रवाद्यांनी गोऱ्यांविरुद्ध प्रतिआंदोलन उभारले. फिरोझशहांची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली 【1884-85】. या पदावर 1905 मध्ये त्यांची फेरनिवड झाली. बाँबे असोसिएशनचे बाँबे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये रूपांतर झाले.त्यावेळी तिचे फिरोझशहा, न्यायमूर्ती तेलंग आणि दिनशा वाच्छा हे पहिले सरचिटणीस झाले. याच वर्षी मुंबईत भरलेल्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनात फिरोझशहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांची राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणना होऊ लागली.
काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी फिरोझशहा मेहतांची अध्यक्षपदी निवड झाली 【1890】. तत्पूर्वी मुंबईच्या कायदेमंडळाचे ते सदस्य झाले होते.पुढे ते इंपीरियल कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय सुचविले तसेच लष्करी व शासकीय खर्चात कपात करावी, यासाठी आग्रह धरला. कर्झनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला... विश्वविद्यालये स्वायत्त असावीत, त्यांवर शासकीय दडपण असू नये, अशा मागण्या केल्या.
इंपीरियल कौन्सिलमध्ये कौन्सिलमध्ये फिरोझशहांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे बजावली. 1904 साली त्यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा पडली. यावेळी जहाल- मवाळ संघर्ष उग्र बनत चालला होता. शेवटी 1907 मध्ये सुरत अधिवेशना वेळी काँग्रेस दुभंगली आणि तिच्यावर मवाळांची पूर्ण पकड बसली.
स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी आणि तेलंगांनी स्वदेशी साबण कारखाना काढण्याचा उपक्रम केला. त्यांच्या पुढाकाराने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.1913 मध्ये बॉंबे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. मुंबई महानगरपालिकेचे तर ते प्रथमपासून अनिभिषिक्त राजेच होते. 1915 साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने एल्एल्.डी ही मानद पदवी देण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाने 1915 चे काँग्रेस अधिवेशनही मुंबईत भरले. 1894 मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सी. आय. ई. हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून विख्यात झाले.
फिरोजशहा यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे निर्भयता. एकदा त्यांनी एखाद्या प्रश्नाबद्दल मत बनविले जाणि त्यानुसार धोरण जाखले की ते पुरस्कार करीत आणि त्यापासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकत नसे. वैचारिक निष्ठा बावनकशी असल्याखेरीज हे साध्य होऊ शकत
■ फिरोजशहांचे कार्य
» 1868 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
1872 मध्ये ते मुंबई महापालिकेचे सदस्य बनले तीन वेळा ते अध्यक्षही बनले. त्याचे 38 वर्षे मुंबई महापालिकेवर वर्चस्व होते.
1885 मध्ये बॉम्बे प्रेसीडेंसी असोसिएशनची स्थापना केली
1886 मध्ये मुंबई लेजिस्लेटिक काउंसिलचे सदस्य बनले
1889 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य झाले तसेच मुंबईमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वागत समितीचे अध्यक्ष झाले.
1890 【कलकता】 व 1901 【लाहौर】 येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले
1892 मध्ये 5 व्या मुंबई प्रांतिक संमेलनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले
1911 मध्ये 'सेंट्रल बैंक ऑफ इंडिया' बँकेच्या स्थापनेत महत्वपूर्ण योगदान दिले,
सर फिरोजशहा मेहता यांच्या विषयीची माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!