सिंकदर शेख नवा महाराष्ट्र केसरी, गटविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवत पटकावली मानाची चांदीची गदा...!
22 वर्षांचा सिकंदर शेख हा कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान असून लहान वयातच त्याने मातब्बर पैलवानांना चितपट केलं आहे. सिकंदरची घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र आई आणि वडील दोघांनीही त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
पुण्यातल्या फुलगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल हाती आला असून गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या 22 सेकंदात आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार आणि महिद्रा थार गाडी पटकावली आहे. मानाची गदा उंचावत त्याने उपस्थितांना अभिवादन केलं आणि आपला विजय साजरा केला. सिकंदर शेख 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवले
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी ही महत्त्वाची होती. या फेरीत सिकंदरचे पारडे जड होते. मात्र शिवराज राक्षे त्याला आव्हान देईल असंही अनेकांना वाटत होतं. मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही. लढत सुरु झाल्यानंतर झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेत चितपट करून विजय मिळवला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिकंदर शेखने अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला पराभवाची धूळ चारत शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडकला होता. या दोघामधली लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव करत सिकंदर शेखने मैदान मारलं आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
सिकंदर शेखने अवघ्या 22 सेकंदात महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. अवघ्या 22 सेकंदात झोळी डावावर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. महाराष्ट्रचा 66 वा महाराष्ट्र केसरी किताब सिकंदर शेखने दिमाखात आपल्या नावावर केला आहे. यावेळी सिंकदर शेख याने बोलताना मागच्या वर्षीसुद्धा मीच महाराष्ट्र केसरी होतो आणि यंदाही मीच आहे. मागच्या वर्षी काही गोष्टी घडल्याने स्पर्धा जिंकू शकलो नाही. मात्र, यावेळी मी आणखी तयारीने उतरलो होतो. सहा ते सात महिने मी कुस्तीची तयारी करत होतो. महाराष्ट्र केसरी हे माझं अंतिम ध्येय नाही. मी माझं वजन वाढवलं आहे. मला देशासाठी मेडल आणायचं आहे, अशी आशा सिकंदर शेख याने बोलून दाखवली.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे
अभिनंदन 66 वा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!